मुंबई- मुंबईतून तडीपार करण्यात आलेल्या आरोपीला तब्बल 30 लाखांच्या अमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे. जॉन डेविड जोसेफ (वय 37) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 300 ग्रॅम वजनाचे एमडी (मेफेड्रो) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 11 ने ही कारवाई केली.
सापळा रचून आरोपीला अटक
12 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 11 ला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मलाड पश्चिम परिसरामध्ये सापळा रचण्यात आला होता. या ठिकाणी जॉन डेविड जोसेफ हा आरोपी आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे 300 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी अमली पदार्थ जप्त केला असून, त्याला अटक केली आहे. दरम्यान आरोपी हा पालघर जिल्ह्यातील वसई येथील राहणारा असून, त्याच्यावर यापूर्वी हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीला मुंबई परिसरातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र असे असतानाही हा आरोपी मुंबईत येऊन अमली पदार्थ तस्करांची टोळी चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.