मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईतील मस्जिद बंदर परिसरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 ने केलेल्या कारवाईत नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट घड्याळे तयार करून त्याची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कारखान्यावर छापा मारला होता. यात 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. या कारवाईत 27 लाख रुपये किमतीची बनावट 4 हजार घड्याळे जप्त करण्यात आली होती. अटक आरोपींच्या पोलीस चौकशीत मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेने युनिट 3 ने या टोळीकडून बनावट घड्याळे विकत घेणाऱ्या चौथ्या आरोपीला 1 कोटींच्या मुद्देमालासह अटक केली आहे.
गुन्हे शाखा युनिट 3 ने मुंबईतील पायधुनी परिसरात सारंग स्ट्रीटवर एका कार्यालयात छापा मारून तब्बल 1 कोटी 5 लाख 62 हजार रुपये किमतीची रोलेक्स, मोवोडो स्वीस, फास्ट ट्रॅक या ब्रँडेड कंपनीची बनावट 5 हजार 281 घड्याळे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेली बनावट घड्याळे ही समाज माध्यमांवरील ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून विकली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. या बनावट घड्याळाची आयात कशा प्रकारे केली जात होती याचाही तपास पोलीस घेत आहेत.