मुंबई - राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या बंगल्यावर गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात 90 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च या बंगल्यांवर करण्यात आला आहे. जलसंपदा विभाग, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च झाला आहे. आरोग्य विभागावर जी तरतूद आहे. त्यात 50 टक्केही खर्च करण्यात आलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
सरकारचे कंत्रादारांच्या हाताकडे लक्ष -
सध्याची परिस्थिती पाहता आपात्कालीन परिस्थितीत कशावर खर्च करायचा? कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे? याचे भान सरकारला असायला हवे. मात्र, कंत्राटदारांचे हित आणि त्यातून मिळणारा मलिदा याकडे सरकारचे लक्ष असल्याची, टीका दरेकर यांनी केली. तसेच हे सरकार कंत्राटदार धार्जीणे असल्याचे देखील ते म्हणाले.
दुरुस्तीसाठी इटालियन मार्बल -
बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी महागडे इटालियन मार्बल वापरण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अनेक मंत्र्यांनी त्यांच्या बंगल्यात विविध प्रकारचे महागडे फर्निचरही मागवून घेतले आहेत. त्यामुळेच हा खर्च 90 कोटींवर गेला आहे.
असा झाला खर्च -
मंत्री | बंगला | खर्च |
मुख्यमंत्री | वर्षा | 3 कोटी 26 लाख |
उपमुख्यमंत्री | देवगिरी | 1 कोटी 78 लाख |
आदित्य ठाकरे | सातपुडा | 1 कोटी 33 लाख |
बाळासाहेब थोरात | रॉयल स्टोन | 2 कोटी 26 लाख |
अशोक चव्हाण | मेघदूत | 1 कोटी 46 लाख |
धनंजय मुंडे | चित्रकूट | 3 कोटी 89 लाख |
सुभाष देसाई | शिवनेरी | 1 कोटी 44 लाख |
छगन भुजबळ | रामटेक | 1 कोटी 67 लाख |
अमित देशमुख | बी 3 | 1 कोटी 40 लाख |
नितीन राऊत | पर्णकुटी | 1 कोटी 22 लाख |
एकनाथ शिंदे | अग्रदूत आणि नंदनवन | 2 कोटी 80 लाख |
मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी खर्च झालेले नाहीत. मी माहिती घेतली, चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याबाबत अद्यार आकडेवारी आलेलीच नाही तर, ९० कोटी रुपयांचा आकडा कुठुन आला?असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.