मुंबई - सध्याच्या डिजिटल युगात व्यक्त होण्यासाठी समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) वापर जगभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतासारख्या 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात संपर्क साधन म्हणून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपसारख्या समाज माध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या समाज माध्यमांवर एकमेकांवर वाईट टीका करण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. देशातील राजकारणाविषयी आपले मत मांडणाऱ्या आणि राजकीय क्षेत्रातील महिला या माध्यमांवरील अश्लील शेरेबाजी आणि शाब्दिक अत्याचाराच्या सर्वात जास्त बळी ठरत आहेत. 'अमनीस्टि इंटरनॅशनल इंडिया' या स्वयंसेवी संस्थेने नुकताच याबाबत एक अहवाल सादर केला.
अमनीस्टि इंटरनॅशनल इंडियाच्यावतीने 2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. निवडणूक प्रचारादरम्यान समाज माध्यमांवर विविध तज्ज्ञ आणि महिला राजकारणीही भाष्य करीत होत्या. निवडणूक लढवणाऱ्या सातशेपेक्षा जास्त महिला समाज माध्यमांवर सक्रिय होत्या. त्यातील 95 टक्के महिलांना शाब्दिक आणि लैंगिक शेरेबाजीला सामोरे जावे लागले आहे. अमनीस्टि इंटरनॅशनल इंडियाच्या अहवलानुसार भारतामध्ये सर्वाधिक हिंदी भाषेत (15.3 टक्के) केलेले ट्विट्स हे महिला उमेदवारांच्या विरोधात होते, तर 14.1 टक्के इंग्रजी आणि 5 टक्के मराठीत केलेले ट्विटस हे अश्लील आणि लैंगिक शेरेबाजीच्या संबंधात होते.
हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिकच्या बाटल्यांपासून उभारणार अंगणवाडी केंद्रांच्या इमारती
भारतात सायबर क्राईमच्या कायद्यांतर्गत अशा प्रकारच्या घटनांवर कारवाई केली जाते. जगभरात अशा प्रकारच्या शेरेबाजीवर बंधने आणण्याची नैतिक जबाबदारी समाज माध्यमांची आहे. समाज माध्यमे वापरताना लोकांसाठी सहज आणि सोपी बनवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शेरेबाजी सारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही त्यांची असल्याचे, सोशल मीडिया विशेषज्ञ अंकुर पुराणिक यांनी म्हटले आहे.