मुंबई - वरळी परिसरात एका कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नमिता चांद या अंधेरी परिसरात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत एनएससीआय येथे जेवण करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी जात होत्या. वरळी येथील खान अब्दुल गफार खान मार्गावरील मेला जंक्शनजवळ त्यांची बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगात गतिरोधकाचा अंदाज न आल्याने पलटी होत बाजूच्या दुभाजकावर जाऊन धडकली. हा अपघात इतका भयानक होता, की यात बसलेली महिला भावना बथिजा ह्या गाडीच्या बाहेर फेकल्या गेल्या. या गाडीत नमिता चांद यांची 6 महिन्याची मुलगी सुद्धा होती. तिचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचा चौथा रुग्ण, हिंदुजामधील 'त्या' रुग्णाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण
ज्या वेळेस हा अपघात घडला त्यावेळी मागून रुग्णवाहिका येत होती. त्यामुळे घटना घडताच जखमी चारही जणांना तत्काळ जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी भावना बथिजा (वय 61), जुही गुरनानी (वय 52) आणि 6 महिन्यांची निषिका यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. चालक नमिता चांद (वय 39) या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, नमिता चांद यांचे पती सध्या तुर्कीत असून त्यांना याबद्दल माहिती देण्यात आल्याचे वरळी पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी या संदर्भात नमिता चांद यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.