मुंबई - मुंबईच्या लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नव्या निर्बंधानुसार आता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय अपातकालीन परिस्थिती असेल, अशांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे. 22 मार्चच्या मध्यरात्रीपासूनच हे निर्बंध लावले आहेत. त्यासाठी सर्वांचे आयकार्ड तपासूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार असल्याची विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. त्यांनी तसा आदेश जाहीर केला आहे.
काय आहे परिपत्रकामध्ये?
"मुंबई महानगर परिसरामध्ये असलेल्या लोकल रेल्वेने दररोज मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करतात. कोरोना विषाणूचा सध्या वाढत चाललेला प्रादुर्भाव विचारात घेता, लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण आणणे आवश्य आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणारे लोक वगळता अन्य व्यक्तींच्या अनावश्यक संचाराला आळा घालणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे."