मुंबई - शाळा सुरू करण्यासाठी आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी राज्यात शिवसेनेकडून युवराजांचे नेतृत्व थोपविण्याचा प्रयत्न आहे. यामुळेच शाळा- परीक्षांच्या संदर्भात तज्ज्ञांशी, लोकांशी न बोलता बेकायदेशीरपणे निर्णय घेतले जात आहेत. यासाठी राज्यात एक स्वतंत्र असे सत्ताकेंद्र निर्माण झाले असून त्याचे परिणाम राज्यातील विद्यार्थ्यांना भोगावे लागतील, अशी भीती माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील शाळांची ऑनलाईन सुरूवात आणि अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या गोंधळावर विचारले असता त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञ व्यक्ती अथवा विरोधी पक्षातील नेत्यांचे मत विचारात घेण्यात आलेले नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ मागतोय, तो दिला जात नाही. जे प्रश्न उपस्थित केले, त्याचे उत्तरही मिळत नाही. मात्र, एका संघटनेने मागणी करताच शाळा सुरू करण्याचा आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो आणि राज्यपालांनाही सांगितले जात नाही. यामुळे युवराजाचे स्वत:चे नेतृत्व थोपविण्याच्या नादात हे सर्व सुरू असल्याचा आरोप शेलार यांनी केला.
ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात पूर्व अभ्यास करण्यासाठी सरकार कमी पडलेले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाची आवश्यकता आहेच, परंतु त्यासाठी एक कार्यपद्धती ठरली पाहिजे. किती वेळ विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी बसवावे यासाठीचे एक धोरण ठरले पाहिजे. परंतु, केवळ मुख्यमंत्री घोषित करतात म्हणून ऑनलाईन शिक्षण लादले जात असून आम्ही याचा विरोध करत असल्याचे शेलार यांनी सांगितले. अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात आम्ही १२ प्रश्न विचारलेत, परंतु त्यावर अजून उत्तर आले नाही. अशात राज्यातील विद्यार्थी युवराजांच्या स्वतंत्र सत्ताकेंद्रामुळे अडचणीत सापडले असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.
अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात मागील वर्षाचे गुण ग्राह्य धरून उत्तीर्ण केले जाणार आहे, मात्र, साडेतीन लाख विद्यार्थ्यांना एटीकेटी आहे, त्यांना हे सरकार नापास करू पाहात आहे, असाही आरोप त्यांनी केला. आेघाडी सरकारमधील एक मंत्री आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याची तयारी दाखवत असताना दुसरीकडे उच्च शिक्षण मंत्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे, ऑनलाईन शिक्षण आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारची हेराफेरी सुरू आहे, असेही शेलार म्हणाले.