मुंबई - काश्मीरमध्ये ड्रग माफिया आणि पाकिस्तानी टोळ्यांमुळे दहशतवाद फोफावला आहे. दहशतवादी हल्ला झालेल्या भागात मी काम केले आहे. काश्मीरमधील शांतता प्रक्रियेला मोदी पंतप्रधान झाल्यानंतर खीळ बसली आहे. दहशतवाद रोखण्यात केंद्र सरकार संपूर्ण अपयशी ठरले असून, निवृत्त सैन्याची मदत घेण्याची मागणी आपचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
मागील काळात स्थानिकांना लष्करात सहभागी करून दहशतवाद्यांना गावबंदी केली होती. मेहबूबा मुफ्ती यांच्या रुपाने कश्मीरमध्ये दहशतवादी सरकार स्थापन केले. काश्मीरमध्ये पाकिस्तानी हस्तक्षेप आणि दहशतवादाचा मुद्दा भारतीय सरकारचा दृष्टीकोन संशयास्पद आणि कमकुवत राहिला आहे.
2001 मध्ये भाजप सरकारने जैशचे प्रमुख अझहर मसूद यांना मुक्त केले होते. परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी मसूदला कंधार येथे नेले होते. 2008च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी अमेरिका आणि हाफिज सईद यांच्या दबावामुळे हेडलीविरूद्ध कोणतीही कारवाई केली नाही, असे सावंत यांनी सांगितले.
2014 मध्ये काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली गेली. त्यानंतर मोदी, मुफ्ती, यांनी पुन्हा दहशतवाद निर्माण केला. बऱ्याच ठिकाणी सीमेवरील आक्रमण क्षेत्रातून सैन्य मागे घेण्यात आले आहे. सीआरपीएफचे जवान तेथे तैनात करण्यात आले आहेत. राफेलच्या निमित्ताने रिलायन्सचा संरक्षण क्षेत्रात प्रवेश झाला आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या साथीने दहशतवाद फोफावला आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे कोणत्याही राजकारण्यावर हल्ला होत नाही. दहशतवाद पूर्णपणे ठेचून काढण्यासाठी ड्रग माफियांवर कारवाई होणे आवश्यक आहे, असेही ब्रिगेड्रीयर सुधीर सावंत यांनी सांगितले.