मुंबई - भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या ट्विटसंदर्भात आम आदमी पक्षातर्फे तक्रार करण्यात आली आहे. लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शुक्रवारी गुप्ता यांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत या दिनाला 'हिंदू साम्राज्य दिवस' घोषित करून त्याच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.
छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा कुटील डाव दिल्लीतून सातत्याने रचला जात आहे, हे यामधून स्पष्ट होत आहे, असे सांगत गुप्ता यांच्याविरोधात आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहितेच्या 505 (2), 153 A व 298 या कलमांतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेल्या अभिमानाच्या, आदराच्या भावनेचा गैरवापर होत असून भाजपा स्वत:चे विखारी जातीयवादी, धर्मवादी राजकारण पुढे रेटत आहे. यामुळे समाजमनात गोंधळ निर्माण होत असून वातावरण कलुषित होत आहे. आम आदमी पक्ष या घटनेचा निषेध करते व संबंधित भाजपा नेत्याने याबाबत जाहीर माफी मागावी, असे शिंदे यांनी म्हटले आहे.