मुंबई: महाराष्ट्रात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पण एकमेकांवर चिखलफेक करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम आदमी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करणार असून याबाबतची रणनीती तयार असल्याचे आम आदमी पक्षाचे राज्याचे सचिव धनंजय शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. ग्रामीण भागत 60 टक्के जनता राहते. या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून राहणारी लोक आहेत. 'आप'चे पंजाब मधिल पहिले मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांनी जन हिताचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागावर लक्ष : पंजाबचे मुख्यमंत्री कृषी क्षेत्रासाठी पंजाब मध्ये कोणते निर्णय घेतात याकडे महाराष्ट्रातला शेतकरी लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे पंजाब मध्ये घेतलेल्या कृषी संदर्भातल्या निर्णयाचा मोठा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. तसेच ग्रामीण भागात सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे शेतीसाठी वीज, पाणी हे आहेत. या मुद्द्यांवर आम आदमी पक्षाकडून लक्ष केंद्रित केले जात आहे. "गाव तिथे शाखा" असा उपक्रम आम आदमी पक्षाकडून गेल्या दोन वर्षापासून राबवला जातोय. "कार्यकर्ता संवाद अभियान" पक्षाकडून सुरू आहे. तसेच महिला सुरक्षेचा मुद्दा घेऊन लवकरच आम आदमी पक्ष जनतेत उतरणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुंबईसाठी खास रणनीती : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील सहा महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. आतापर्यंत जवळपास शंभर जागांवरच्या उमेदवारांची निवड झाली आहे. मुंबईमध्ये वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम आदमी पक्ष लक्ष केंद्रित करणार असून दिल्लीप्रमाणे मुंबईत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास प्रयत्न करेल असे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेवर 27 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. यामध्ये 25 वर्ष भारतीय जनता पक्षही त्यांच्यासोबत होता.
जनतेची केवळ फसवणूक झाली : पालिकेत विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनीही जनतेची केवळ फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जातो. चारही पक्षाचे नगरसेवक गटार दुरुस्तीच्या नावाखाली 80 टक्के निधी दरवर्षी खर्च करतात. मात्र तरीही मुंबईतील गटारांची समस्या अजून सुटलेली नाही. तसेच इतर महत्वाचे प्रश्न देखील प्रलंबित असून या प्रश्नांना मार्गी लावण्याचे काम आम आदमी पक्षाकडून करण्याचा पक्षाचा मानस आहे असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
केजरीवाल लक्ष केंद्रित करणार : पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर आता गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) आणि त्यांच्या टीमने लक्ष केंद्रित केले आहे. यानंतर केजरीवाल आणि टीम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणार आहे. महाराष्ट्रा सारखे मोठे राज्य आपल्याकडे असावे यासाठी केजरीवाल दौरे करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 'आप'ला मिळणारा यशावर पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपने तीनशे उमेदवार उभे केले होते. पैकी 145 उमेदवार निवडून आले.त्यामुळे पक्षाची मोठ बांधणी सुरू केली आहे.
'आप'च्या यशा बाबत साशंकता: आपला दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्ता मिळवता आली. गोव्यात खाते उघडले. गुजरात मधेही आम आदमी पक्षाला यश मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र महाराष्ट्र हा आम आदमी पक्षासाठी सोपा नाही. महाराष्ट्रातली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीमध्ये सत्ता आल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती पंजाब मधून त्यांना मिळाली. दिल्ली हे पंजाब लगत असलेले राज्य असल्यामुळे त्यांनी केलेल्या कामांबाबत पंजाब मध्ये चर्चा होती. मात्र महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लगेच पक्षाला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रात मोठी राजकीय उलाढाल करण्यासाठी आम आदमी पक्षाला स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभारावी लागणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी व्यक्त केले आहे.