पणजी - गोव्याचे उद्योग आणि आरोग्य मंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आय आय टी प्रकल्पाला विरोध दर्शवला. आपण तेथील स्थानिक लोकांसोबत असल्याचे म्हटले आहे. यांचा जर खरोखर विरोध असेल तर त्यांनी प्रत्यक्ष आंदोलकांसोबत राहून विरोध दर्शवावा, असे आव्हान आम आदमी पक्षातर्फे आज देण्यात आले.
'मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांमध्ये समन्वय नाही'
पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवक्ते सुरेल तिळवे बोलत होते. ते म्हणाले, मेळावलीत आंदोलन आणि वातावरण पाहून आपल्या अंगावर काटा येतो, असे विश्वजीत राणे म्हणातात. मग जेव्हा एका महिलेच्या पोटावर पोलीस निरीक्षकाने पाय ठेवला, अश्रुधूर सोडला, लाठीमार केला तेव्हा अंगावर काटा आला नाही का? राणे आमदार म्हणून लोकांच्या प्रश्नाकडे कधी पाहणार, असा सवाल करत तिळवे म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. आय आय टी विषयामध्ये हेच दिसत आहे. भाजपा सरकार यूटर्न घेते, हे सर्वांना माहिती होते. परंतु, आता राणेही त्यांच्यामध्ये हे जाऊन शिकलेले दिसतात. त्यांना हिंमत असेल तर त्यांनी तेथील ग्रामस्थांच्याबरोबरीने प्रकल्पाला विरोध जाहीर करावा. आयआयटी प्रकल्प विरोध हा आता केवळ शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर तो आता सर्वच कूळ-मुंडकार यांच्या जागेच्या हक्काचा प्रश्न बनला आहे, असे तिळवे म्हणाले.
'आंदोलकांना गोमंतकीयांनी साथ द्यावी'
जो पर्यंत सरकार अध्यादेश काढून प्रस्थापित ठिकाणचा प्रकल्प रद्द झाला असे जाहीर करत नाही, तोपर्यंत तो रद्द झाला असे म्हणता येणार नाही. मेळावलीतील आंदोलकांना आता परिसरातील गावांचाही पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे सदर ठिकाणचा प्रकल्प रद्द होणारच. या आंदोलकांना गोमंतकीयांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.