मुंबई- कोरोना आणि त्यानंतरच्या काळात लादण्यात आलेल्या लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे जगणे आणि मरणेही अवघड केले. सर्व काही बंद होते. कामधंदा नाही म्हणून जगायचे कसे, म्हणून लाखो कामगारांनी शहर सोडून गावाकडचा रस्ता धरला. या रस्त्याने त्यांना अनेकदा मरणयातना दिल्या. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. तशीच अवस्था मुंबईतील सफाई कर्मचारी, कचरा वेचणारे, धुणी-भांडी करून आपले आयुष्य जगणाऱ्या महिलांच्या आयुष्याची झाली. अशा असंख्य कष्टकरी आणि कामगारांची व्यथा सफाई कामगार असलेल्या विलास कोंडगेकर यांनी आपल्या 'कोरोना आणि आम्ही' या पुस्तकातून मांडल्या आहेत.
कोंडगेकर यांच्या पुस्तकाचे नुकतेच मुंबईत प्रकाशन झाले असून या पुस्तकाने हृदय हेलावून टाकणारे अनुभव आणि जगण्यातील वास्तव मांडले आहे. मुंबईतही स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची लॉकडाऊनने जगण्याची वाताहत करून सोडली. रोजंदारीवर असलेल्या कामगारांचे प्रश्नही तितकेच भयान होते. त्यांच्यासमोर अनेक संकटे उभे राहायची. त्याचे अनेक वास्तव या पुस्तकातून मांडले गेले आहे. चेंबूर येथील सफाई कर्मचारी विलास कोंडगेकर यांनी हे पुस्तक लिहून कोरानामुळे असंख्य कामगारांच्या जगण्याची वाताहत कशी झाली याला वाचा फोडली आहे.
याबाबत कोंडगेकर म्हणतात की, लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते. कामावर कसे यायचे याबाबत चर्चा चालायच्या. कसे बसे कामावर कामगार आले. समोर कोरोनाची भीती, त्यामुळे त्यांची जी तारांबळ होत होती ती खूप हृदय द्रावक होती. लोक चालत गावी जाऊ लागले होते. हा एक भयानक अनुभव होता. त्या चालत निघालेल्या लोकांना जेव्हा विचारले तेव्हा 1 हजार 800 किलोमीटर चालायचे, असे कळले. तेव्हा विचार केला की, काय ही अवस्था. आणि यातून आपण हे पुस्तक लिहायला घेतले असल्याचे ते म्हणाले.
हातावर पोट असलेल्या अनेक कामगारांची व्यथा ही हृदय हेलावून टाकणारी होती. म्हणून आपण ती पुस्तकातून मांडली असल्याचे कोंडगेकर म्हणाले. माझे 'कोरोना आणि आम्ही' हे पुस्तक नसून एक आवाज आहे, असेही ते म्हणतात. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कोंडगेकर यांच्या 'कोरोना आणि आम्ही' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यांनी हे पुस्तक कामगारांना आणि कोरोनामुळे आयुष्य संपवलेल्या हुतात्म्यांना अर्पण केले आहे. स्वत: सफाई कामगार असतानाही त्यांनी अनेक कष्टकऱ्यांची व्यथा पुस्तकातून जगासमोर मांडल्या आहेत.
हेही वाचा- अत्यावश्यक सेवेतील प्रवासी लोकलमध्ये अडकले