मुंबई- लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करताना अनेक एसटी चालक-वाहक कोरोनाबाधित झाले आहे. अशाच एका एसटी बस वाहकाने कोरोनावर मात करत पुन्हा सेवा बजावण्यासाठी साडे सात तासाचा कराड ते मुंबई प्रवास दुचाकीने केला आहे. संतोष बाळू गायकवाड, असे या एसटी बस वाहकाचे नाव आहे.
एसटीचे अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने घरी आहेत. तर अनेकांनी पगार नसल्याने इतर काम करणे सुरू केले आहे. तर काहींनी अद्याप कामावर येण्यास सुरुवात केलेली नाही. अशा परिस्थितीत संतोष गायकवाड सारखे वाहक एसटीच्या अविरत सेवेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पनवेल ते दादर या मार्गावरील एसटी बसमध्ये संतोष गायकवाड हे वाहक म्हणून आपली सेवा बजावत होते. मात्र, कर्तव्यावर असताना संतोष यांना ताप आला. त्यांनी प्रवशांना डेपोत सोडले. त्यांना 104 इतका ताप होता. चालण्याची ताकद नव्हती. अशा अवस्थेत सहकारी मित्रांनी त्यांना लगेचच पालिकेच्या नायर कोविड रुग्णालयात नेले. तातडीने तिथे कोरोना स्वॅब टेस्ट करण्यात आली आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तातडीने त्यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तब्बल 11 दिवस नायर रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये संतोष गायकवाड यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईत नातेवाईक नाही, पगार नसल्याने खिशात पैसेही नव्हते. अशा परिस्थितीत कोविड सेंटरमधून मिळणाऱ्या जेवणावरच त्यांनी निभावले. नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मेडिकल स्टाफकडून त्यांना चांगली वागणूक मिळाली. 11 दिवसांनी अहावल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला.
यावेळी, माझे मुंबईमध्ये कोणी नातेवाईक नसल्याने मला माझ्या गावी कराडला जावे लागले व तेथे जाऊन स्वतःला विलगीकरण करून घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले. कोकणासाठी विशेष गाड्या एसटी महामंडळातर्फे सोडण्यात येत आहेत. मुंबईला येण्यासाठी वाहनांची ठराविक वेळ नसल्याने थेट घरातील दुचाकी घेऊन शुक्रवारी (7 ऑगस्ट) संध्याकाळी मुंबईत हजर झालो. आता कोकणातील वाहतूक चालू झाली आहे. आता जे काम देतील ते पार पाडू, असे गायकवाड म्हणाले.
तसेच, आपण जिथे काम करतो आणि ज्याच्यामुळे आपले घर चालते, अशा एसटीचे आपण काही तरी देणे लागतो. त्यात अशा परिस्थितीत एसटीला एकटे सोडणे म्हणजे आपल्या माऊलीला वाईट परिस्थितीमध्ये एकटे सोडणे, असे होते म्हणून कामावर हजर झाल्याची प्रतिक्रिया संतोष गायकवाड यांनी व्यक्त केली.
हेही वाचा- 'त्यांच्या' नाड्या आवळण्यासाठी मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा, महापौर आक्रमक