मुंबई - वाढत्या तापमानापासून आपला बचाव करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या उपाययोजना करतो. असाच एक अजब प्रयोग मुंबईतील एका डॉक्टरने स्वतःच्या एक्सयूव्हीवर केला आहे.
उष्णतेपासून बचाव करण्याकरिता या डॉक्टरने आपल्या महिंद्रा एक्सयूव्ही 500 या चारचाकी गाडीला शेणाचा लेप दिला. असे केल्यामुळे उष्णतेपासून सुटका झाली असून थंडावा मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गाडीला एकदा दिलेला शेणाचा लेप महिनाभर टिकत असून त्यामुळे गाडीचे कोणतेही नुकसान होत नसल्याचाही दावा त्यांनी केला. डॉ नवनाथ दुधाळ, असे या प्रयोग केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मावळ मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली होती.
डॉ. दुधाळ हे प्रसिद्ध टाटा कॅन्सर रुग्णालयात डॉक्टर आहेत. उन्हाचा वाढता तडाखा काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याने या वाढत्या उष्णतेपासून बचाव होण्यासाठी नाना तऱहेचे उपाय नागरिक करताना दिसतात. पण नवनाथ दुधाळ यांनी एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी स्वतःची महिंद्रा एक्सयूव्ही 500, ही चारचाकी गाडी शेणाने लेपली. खिडकी, काच आणि लाईट वगळता संपूर्ण गाडीवर त्यांनी शेणाचे तीन थर लेपले आहेत.
यासंदर्भात बोलताना दुधाळ म्हणले, उस्मानाबाद जिल्ह्यातील दुधळवाडी गावात राहतात. त्यांच्या गावात 42 ते 44 डिग्री इतके तापमान राहते. या तापमानापासून बचाव करण्यासाठी त्यांनी आपल्या गाडीवर हा प्रयोग केला आहे. त्यांनी संपूर्ण गाडी शेणानी सारवली आहे. असे केल्यामुळे गाडीच्या आतील तापमान कमी झाले. खूप लवकर त्यांची गाडी थंड होते. याशिवाय गाडी धुवावीही लागत नाही. पर्यायाने पाण्याचीही बचत होते. अडचण फक्त एकच आहे की, गाडीला शेण लावल्यानंतर काही काळ वास येतो. मात्र शेण वाळल्यानंतर हा वासही निघून जातो. अशी माहिती त्यांनी दिली.