मुंबई - देशात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत असली तरी सायबर गुन्ह्यांचे प्रकार सुद्धा वाढत चालले आहेत. अशाच प्रकारचा खळबळजनक प्रकार समोर आला असून मुंबईतील राहणाऱ्या संजय मखिजा या व्यापाराच्या मोबाईलमधील सिमकार्ड परस्पर क्लोन करून त्याच्या बँक खात्यातून तब्बल 2 कोटी रुपये हातोहात सायबर चोरांनी उडविल्याची घटना समोर आली आहे.
संजय मखिजा यांच्या बँक खात्यातून 2 कोटी रुपये 32 व्यवहारांच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून काढून घेण्यात आले होते. या संदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली असता संजय मखिजा यांच्या मोबाईल फोनमधील सिमकार्ड हे क्लोन करून ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आपण कधीही आपले सिम कार्ड रद्द करण्यासाठी मोबाईल कंपानीकडे विनंती केली नसल्याचे पीडित संजय मखिजा यांनी म्हटले आहे. या संबंधी सायबर क्राईमचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
काय आहे सिमकार्ड क्लोनिंग
सायबर एक्स्पर्ट अंकुर पुराणिक यांच्या म्हणण्यानुसार सिमकार्ड क्लोनिंग करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे बनावट कागदपत्रे बनवून मोबाईल कंपन्यांच्या देशभरातील कुठल्याही गॅलरीत जाऊन सिम कार्ड रद्द करून नवीन सिमकार्ड घेतले जाते. यानंतर शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात संबंधित व्यक्तीच्या बँक खात्याचे डिटेल्स नेट फिशिंग करून मिळविले जातात. त्यानंर मध्यरात्रीच्या सुमारास डेटा हॅक करून अचानक बँक खात्यावर सायबर गुन्हेगार हात साफ करतात.
काही प्रकरणात पीडित व्यक्तीच्या मोबाईल सिम कार्डचा आयएमएसआय (आंतरराष्ट्रीय मोबाइल ग्राहक ओळख) क्रमांक मिळविला जातो. हा क्रमांक मिळाल्यानंतर एका सिमकार्ड क्लोनिंगच्या साहायाने एका ब्लॅंक मोबाईल सिम चिपवर संबंधित मोबाईल फोनचा संपूर्ण डेटा हॅक केला जातो. यानंतर त्या मोबाईल फोन नियंत्रण आपोआप सायबर चोराकडे जाऊन यातील बँकिंग व्यवहार व ओटीपी सायबर चोराकडे जातो.
- हे टाळण्यासाठी काय करायला हवे
- तुमच्या मोबाईलमधील सिमकार्ड हे जर फार जूने असेल व ते जर कॉम्फ 1 या व्हर्जनचे असेल तर ते तत्काळ बदलून कॉम्फ 3 चे नवे सिमकार्ड घ्या.
- तुम्ही कुठल्याही कारणासाठी तुमचे वैयक्तिक कागदपत्रे कोणाला देत असाल तर त्यावर कागदपत्रांवर नमूद कारण लिहा.
- मोबाईल फोन अचानक नो सिम कार्ड दाखवत असेल किंवा नो नेटवर्क हे मोठ्या तासासाठी दाखवत असेल तर त्वरित तुमचे बँक खाते हे काही वेळासाठी गोठवा.
- नेटफ्लिक्स, पेटीएम सारख्या अॅपच्या नावाने लिंक व्हॉट्स अॅप किंवा मेसेजवर आले असता त्या लिंक वर क्लिक करू नका.
हेही वाचा - 'शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत'