मुंबई - प्रशांत दामले यांच्या "एका लग्नाची दुसरी गोष्ट" या नाटकाचा १२५०० वा विक्रमी प्रयोग षनमुखानंद हॉल किंग सर्कल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार विनय सहस्त्रबुद्धे, पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशांत दामले यांचा सन्मानपत्र देवून सत्कार केला. यावेळी प्रशांत दामले फॅन्स क्लबकडून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याची मागणी करण्यात आली यावेळी फडणवीस यांनी शिफारस केली असल्याचेही सांगितले आहे.
मुंबई, ठाण्याच्या मध्यभागी एक चित्रनगरी - प्रशांत दामले यांच्या नाटकाचा १२५०० वा विक्रमी प्रयोग होत आहे. पण आपणही १२५०० नाटक केली आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड काळात नाट्यगृहांचे भाडे कमी करा अशी मागणी दामले यांनी केली होती. मी त्यावेळी भाडे कमी केले. त्यावेळी मी एकटा होतो. आता मी आणि उपमुख्यमंत्री असे आम्ही दोघे आहोत. त्यामुळे कामे लवकर होतात. आमच्या ठाण्यात मोठ्या संख्येने लोक शुटींगसाठी येतात. त्यासाठी मुंबई आणि ठाण्याच्या मध्यभागी एक चित्रनगरी उभारली जाईल. तसेच, राज्यातील ५१ नाट्यगृहाची नोडल ऑफिसर नियुक्त करून पाहणी केली जाईल. नाट्यगृहात ज्या काही कमी असेल त्याची पूर्तता करून ती अद्ययावत केली जातील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
रंगभूमीसाठी अभिमानाची बाब - एखाद्या नटासाठी रंगभूमीवर १२,५०० प्रयोग पार पाडणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही. हा प्रवास खडतर असणार हे निश्चितच आहे. त्यानंतर आता प्रशांत दामलेंना पद्म पुरस्कार मिळणे ही त्यांच्यासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीसाठी अभिमानाची बाब आहे अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. प्रशांत दामलेंना या प्रवासात अनेक चढउतार पाहायला मिळाले. एवढ्या वर्षांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. आता रंगभूमी वरील त्यांच्या १२,५०० व्या प्रयोगानिमित्त त्यांनी या कडू गोड आठवणींना उजाळा दिला आहे.
तो खरा नाटकवाला - या प्रवासाविषयी त्यांनी जुन्या आठवणी सांगत लिहिलं आहे कि, ' येत्या काही दिवसांतल्या माझ्या १२,५०० व्या प्रयोगाचं! लोक मला विचारतात, ‘या टप्प्यावर मागे वळून बघताना कसे वाटते?, पण खरं सांगतो, हे एवढे प्रयोग कधी, कसे झाले, मला कळलेच नाही. मला नाटक करायचे आहे, लोकांना नाटक दाखवायचे आहे एवढेच मला कळत होते. तसा ‘नाटकवाला’ होण्याला घरून विरोधच होता. तेव्हा संगीत नाटकांचा भर ओसरत चालला होता. त्यामुळे ‘आता नाटकाचे कसे होणार?’ ही चर्चाही सुरू झाली होती. पण तुम्हाला म्हणून सांगतो- ही चर्चा सतत होतच असते. परंतु, नाटक आजवर काही थांबलेले नाही. काळानुसार फक्त ते बदलत गेले. आणि हे जो जाणून असतो, तो खरा नाटकवाला!' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.