मुंबई - दुचाकी घसरून झालेल्या विचित्र अपघातात एका 19 वर्षीय तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली येवून जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात भांडुपच्या एलबीएस मार्गावर झाला.
इब्राहीम मिया अन्सारी (वय 19) असे मृत तरुणाचे नाव आहे. इब्राहीम हा पन्नालाल कंपाऊंड जवळ एका गॅरेजमध्ये काम करत होता. बाईकच्या टेस्टिंगसाठी मुलुंडच्या दिशेने जात असताना त्याची दुचाकी घसरली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली तो चिरडला गेला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
हेही वाचा - मुंबईतील सीएसएमटी येथील म्हाडाच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला
या घटनेनंतर अज्ञात ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दोन आठवड्यांपूर्वी इब्राहिम गॅरेजमध्ये कामाला लागला होता. बाईक टेस्ट करत असताना त्याने हेल्मेट घातले नव्हते. जर हेल्मेट घातले असते, तर कदाचित तो वाचू शकला असता. दरम्यान, भांडुप पोलीस फरार ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.