मुंबई - जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या(सीएसएमटी) हेरिटेज इमारतीला नवीन झळाळी देण्याचे काम वेगात सुरू आहे. या इमारतीच्या दर्शनी भागाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. दर्शनी भागाचे उर्वरित काम एप्रिल महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. तर, संपूर्ण इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी एका वर्षाचा कालावधी लागणार आहे.
सीएसएमटीच्या इमारती युनेस्कोच्या जागतिक दर्जाच्या ग्रेट-1 या हेरिटेज इमारतींमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे या इमारतींचे देखभाल आणि दुरुस्तीसाठी कुशल कारागीर, दगड कारागीर, अभियंते आणि पर्यवेक्षक यांच्या अनुभवाच्या जोरावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. आतापर्यंत हेरीटेज इमारतीच्या बाहेरील भिंतीवर काही प्रमाणात तडे पडले होते, ते तडे भरून काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच इमारतीच्या समोरच्या भागाच्या दगडांची स्वच्छता करण्यात आलेली आहे. हाय प्रेशरच्या पाण्याचा वापर करून ही स्वच्छता करण्यात आली. तसेच हवामानातील बदलामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या मुख्य इमारतीमधील दगडांच्या जोडणीतून रोपे वाढलेली आहेत. ती रोपे देखील काढण्यात आली आहेत.
![सीएसएमटीचा दर्शनी भाग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-csmt-railway-heriteja-7209757_15032021193615_1503f_1615817175_884.jpg)
दुसऱ्या टप्प्यातील काम -
सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या रिस्टोरेशनच्या कामाला 1997 मध्ये सुरुवात झाली होती. सध्या सुरू असलेले काम हे दुसऱ्या टप्प्यातील आहे. हा संपूर्ण रिस्टोरेशनचा प्रकल्प काही ठराविक टप्यात विभागण्यात आला आहे. आतापर्यंत या इमारतींच्या दर्शनी भागाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच आता इमारतीच्या मध्यवर्ती भागातील घुमटाचे काम होणार आहे. स्टार चेंबरचेही काम ठराविक टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
हेही वाचा - ईडीचा दणका; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयाची संपत्ती जप्त