मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाच्या नव्या 875 रुग्णांचे निदान झाले असून, 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजार 564 तर मृतांचा आकडा 508 वर पोहचला आहे. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असताना 3 हजार 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोनाच्या नव्या 875 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यात गेल्या 24 तासात 678 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 7 ते 8 मे रोजी खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केलेले 197 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 13 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. 19 मृतांमध्ये 10 पुरुष तर 9 महिला रुग्ण आहेत. मृत झालेल्यांपैकी एकाचे वय 40 वर्ष, 5 जणांचे वय 60 वर्षाच्या वर तर 13 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान आहे. मुंबईमधून आज 212 रुग्णांना ते बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईमध्ये आतापर्यंत 3004 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
धारावीत नवे 26 रुग्ण -
मुंबईत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत 26 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीमधील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 859 वर पोहचला आहे. तर धारावीमध्ये आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.