मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सद्या सुरू आहे. यात अनेक विषय, चर्चा तसेच आंदोलन पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. पण या अधिवेशनात आठ महिन्याच्या गर्भवती असतानाही सभागृहात येऊन कामकाजात सहभागी होणाऱ्या नमिता मुंदडा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सद्या सोशल मीडियावर मुंदडा यांचीच चर्चा रंगली असून नेटीझन्स त्यांच्या निष्ठेला सलाम करत आहेत.
नमिता मुंदडा या बीडच्या केज विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी विधानसभेची निवडणुक जाहीर होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसला तडकाफडकी सोडचिठ्ठी देत आत्ताच्या माजी महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा ३२,९८३ मताधिक्याने पराभव केला.
आता आठ महिन्याच्या गर्भवती असतानाही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत असल्याने मुंदडा सद्या चर्चेत आल्या आहेत. मुंदडा, अधिवेशनात केवळ उपस्थिती दर्शवत नाहीत तर आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. अधिवेशनात त्यांना सतत बसताना त्रास होतो. याविषयी एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना त्यांनी सांगितलं की, 'मी माझे कर्तव्य पूर्ण करत आहे. हे करत असताना मी गरोदरपणात घ्यावयाची योग्य काळजीही घेत आहे. गरोदरपणामध्ये पाय हात सुजतात. कंबर दुखते. पण, मला माझ्या मतदारसंघाचे प्रश्न महत्वाचे वाटतात. यामुळे मी सभागृहात हजेरी लावते.'
आगामी पावसाळी अधिवेशनात मला किती वेळ देता येईल, हे सांगणे कठिण आहे. कारण त्यावेळी साधारण माझे बाळ दोन-एक महिन्याचा असणार आहे. मी पहिल्यादांच आई होत आहे. यामुळे मला काळजी घ्यावी लागणार आहे. मी सद्या जेवढे शक्य आहे तेवढे मी अध्यक्षासमोर माझ्या मतदार संघातील प्रश्न उपस्थित करणार आहे. मला जास्त एका ठिकाणी बसता येत नाही. यामुळे मी दर अर्धा तासाने सभागृहातून बाहेर येऊन लॉबीमध्ये बसते, असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, नमिता मुंदडा या पहिल्याच महिला आमदार आहेत ज्या गरोदर असताना कामकाजात सहभागी होत आहेत.