मुंबई - महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर आज अनेक कर्मचारी गैरहजर आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसात पाच मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. मात्र, राज्याचा गाडा हाकणारे मंत्रालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.महसूल विभागातील जवळपास आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आल्याची झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने महसूल विभागातील इतर कर्मचारी गैरहजर होते. मंत्रालयात कर्मचाऱ्यांना होणाऱ्या कोरोनामुळे सुरक्षारक्षक, पोलीस सफाई कर्मचारी आणि इतर विभागातील कर्मचारी भीतीच्या छायेत आहेत. राज्यभरात कोरोना वाढत आहे. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले आहे. तर कार्यालयीन वेळा बदलल्या पाहिजेत, असा सल्लाही दिला आहे. त्यामुळे मंत्रालयातही याचा प्रयोग केला जाईल का? यावरही चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा - अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
मंत्र्यांनाही कोरोनाची लागण -
कर्मचाऱ्यांआधी काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जवळपास तीन दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या पाच मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. तर याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यमंत्री बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली. दरम्यान, तर काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती.