मुंबई - दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज मुंबईत नव्याने 751 रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 7 हजार 625 वर तर मृतांची संख्या 295 वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत 1 हजार 567 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
![7 thousand 625 corona positive cases in mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-corona-mumbai-7205149_01052020215756_0105f_1588350476_467.jpg)
मुंबईत कोरोनाचे 6 हजार 870 रुग्ण होते. त्यात आता नव्या 751 रुग्णांची भर पडली आहे. 751 पैकी गेल्या 24 तासात मुंबईत 352 तर 25 ते 28 एप्रिल दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचणी केलेले 399 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 3 जणांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 3 पुरुष तर 2 महिला आहेत. मृतांमध्ये एकाचे वय 40 वर्ष, दोघांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान तर दोघांचे वय 60 वर्षावर होते. मुंबईत 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 295 वर पोहोचला आहे. मुंबईमधील विविध रुग्णालयातून गेल्या 24 तासात 95 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईमधून आतापर्यंत 1 हजार 567 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापैकी 108 रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. जे मुंबईमधील रुग्णालयात उपचार घेत होते, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.