मुंबई : शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली पूर्व) येथील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्र १८८ ( मर्या.) च्या ६ अतिरिक्त बसगाड्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० या दरम्यान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्र. ५७ (वाळकेश्वर ते पी.टी. उद्यान-शिवडी), बसमार्ग क्र. ६७ (वाळकेश्वर ते अँटॉप हिल) आणि बसमार्ग क्र. १०३ (वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक) या तिन्ही मार्गांवर सकाळी ७.०० ते सायं. ७.०० या वेळेत ६ अतिरिक्त बसेस चालविण्यात येतील. भाविकांनी या अतिरिक्त बस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.
ऑफरला प्रवाशांचा प्रतिसाद : बेस्ट उपक्रमांकडून प्रवाशांसाठी सण उत्सवात विविध ऑफर याआधी देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, नवरात्र, गणेशोत्सव, दिवाळी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापिनिर्वाण दिनी बेस्टकडून विविध ऑफर देण्यात आल्या होत्या. या ऑफरमुळे प्रवाशांना कमी खर्चात जास्तीत जास्त प्रवास करण्याची संधी बेस्टने उपलब्ध करून दिली होती. कमी खर्चात जास्तीत जास्त प्रवास करण्याची संधी बेस्टकडून उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांनी या ऑफरला प्रचंड प्रतिसाद दिला होता. या विविध ऑफर्समुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अनेक प्रवाशांनी या विशेष ऑफरचा फायदा देखील घेतला होता.
बेस्ट प्रवाशांना या सुविधा : बेस्टकडून प्रवाशांना गारेगार प्रवास करता यावा म्हणून एसी बसेस चालवल्या जात आहेत. चलो अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना कमी खर्चात अधिक प्रवास करता येईल, अशा योजना प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बस सध्या कुठे आहे? ती स्टॉपवर किती वेळात पोहचेल? याची माहिती या अॅपद्वारे प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. बेस्टने सध्या ४३ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. या विशेष ऑफर्समुळे बेस्ट प्रवाशांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडत आहे.