मुंबई - तामिळनाडुच्या थुट्टुकोडी आणि विरुद्दुनगर जिल्ह्यातील 8 जण मुंबईतील धारावी येथे आले होते. हे 8 जण तामिळनाडूहून कपडे (साड्या) घेऊन मुंबई येथे आले. ते लोकांच्या घरोघरी जाऊन विक्री करत होते.
लॉकडाऊनमुळे सर्व 8 लोकांना फक्त एका लहान खोलीतच रहावे लागले. या 8 लोकांमधील दोघांना कोरोना विषाणूची लागण झाली. यांच्यापैकी एक 62 वर्षांचे रुग्ण होते, त्यांचा 14 एप्रिलला मृत्यू झाला. तर, दुसऱ्या एका 48 वर्षांच्या व्यक्तीचा 17 एप्रिलला मृत्यू झाला. या प्रकारामुळे तर उर्वरित 6 लोक घाबरले आणि स्वत:ला वाचवण्यासाठी ते सायन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले. परंतु, त्यांच्या तामिळ भाषेमुळे ते व्यवस्थित संवाद साधू शकत नव्हते. म्हणून त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये कुणीही मदत केली नाही. तर रुग्णालयाच्या एका व्यक्तीने त्याना स्थानिक लोकप्रतिनिधीशी संपर्क करून दिला. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या रुग्णांची महापालिकेने तयार केलेल्या क्वारंटाईन सेन्टरमध्ये रवानगी करण्यात आली. या 6 जणांची येथे तपासणी केली जाईल आणि या 10 दिवसात त्यांना सर्व सुविधा पुरविल्या जातील.