मुंबई - शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबईत कोरोना विषाणूची लागण आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांना झाल्यानंतर आता मीडिया कर्मचाऱ्यांनादेखील झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका इंग्रजी वृत्त वाहिनीच्या ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
या पॉझिटिव्ह रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, इतर कर्मचाऱ्यांना वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूचे भारतात हजारो रुग्ण आढळून आले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत कोरोनाची लागण झालेले ११८२ रुग्ण असून ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या लोअर परेल येथील कमला मिलमध्ये एका इंग्रजी वृत्त वाहिनेचे कार्यालय आहे. या वृत्त वाहिनीत पीसीआरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. या कर्मचाऱ्याच्या सहवासात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची आणि नातेवाईकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यात सहा जण पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यात ड्रायव्हर, पीसीआरमध्ये काम करणारा कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
भोपाळमध्ये पत्रकाराला झाली होती लागण -
मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरातील एका पत्रकाराला कोरोनाची लागण झाली होती. या पत्रकाराच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे आधी स्पष्ट झाले. त्यानंतर या पत्रकाराची तपासणी केली असता त्यालाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा पत्रकार मध्य प्रदेश राजकीय संघर्षाच्या काळात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होता.