मुंबई : आज आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुंबई महापालिकेत घोटाळे वाढले आहेत. वारंवार पत्रव्यवहार करुनही कारवाई होत नाही. या सर्व प्रकरणाची आणि मुंबई मनपा आयुक्तांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन केली. शिवसेना सचिव अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, आमदार अनिल परब असे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पळून जातात : गेल्या सहा सात महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अनेक भ्रष्टाचार लोकांसमोर आणलेले आहेत. राज्यपालांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक हे या सगळ्याला जबाबदार आहेत. बिल्डर कॉट्रॅक्टर यांचे सरकार सत्तेत बसले आहे. रस्त्यांचा मेगा टेंडर घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला आहे. ६ हजार कोटींचा रस्ता घोटाळा झाला. १० रस्त्यांची कामे देखील अद्याप सुरू झालेली नाहीत. गद्दार गॅंग सोडली तर सगळ्यांनी तक्रारी केल्या. मात्र अद्याप कारवाई नाही झालेली आहे. लोकशाही धाब्यावर बसवली जात आहे. आर्थिक गैरव्यवस्थापन आणि कंत्राटदारांना प्रशासनाकडून खिरापत वाटली जात आहे. तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्री पळून जात आहेत. कधी शेतात तर कधी गुवाहाटी कुठेही निघून जात असल्याचा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
ठेकेदारांना फायदा मिळवून देण्याचे प्रयत्न: येत्या दोन महिन्यांत पावसाळा सुरू होईल. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हायला हवी. परंतु, अद्याप कामांना सुरुवात झालेली नसल्याने या सर्व प्रकरणाची लोकायुक्ता मार्फत चौकशी करावी. त्याचबरोबर महापालिका आयुक्तांची देखील चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. लोकशाही आणि संविधानाचे संरक्षक म्हणून अपेक्षेने पाहत आहोत. आपण यातील गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे. तसेच राज्यात दुर्दैवाने महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणजे करप मॅन सीएम आहेत. वेदांता फॉक्सकॉन पासून अनेक प्रकल्प आणण्यासाठी दावोसमध्ये गेले. कोट्यवधी रुपये खर्च केले. कॉन्ट्रॅक्टरना ६६ टक्के फायदा पोहोचवला जातो आहे. या आरोपाचे पुरावे राज्यपालांकडे निवेदनासह दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -