मुंबई- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने राज्यातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेले कोरोनाचे 6 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा- कोरोना अपडेट : राज्यात पहाटे पाच वाजेपर्यंत जनता कर्फ्यू वाढवला - आरोग्यमंत्री
रविवारपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 74 रुग्ण आढळून आले होते. त्यालीत मुंबई आणि परिसरात 36 रुग्ण आहेत. यापैकी एकाचा 17 मार्चला तर अन्य एकाचा 21 मार्चला मृत्यू झाला. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारामुळे 6 रुग्ण बरे झाले आहेत. 11 ते 14 मार्च दरम्यान जे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी हे रुग्ण आहेत. मात्र सोमवारी राज्यातील एकूण रुग्ण संख्येत आणखी 15 जणांची भर पडली आहे.
कोरोना रुग्णांच्या स्वाबच्या (घशातील लाळ) तपासण्या करण्यात येतात. एखाद्या रुग्णाच्या अशा दोन चाचण्या लागोपाठ निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण बरा झाला, असे समजण्यात येते. अशा लागोपाठ दोन चाचण्या निगेटिव्ह आलेले हे रुग्ण आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार या रुग्णांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
23 जानेवारीपासून मुंबईत 4 हजार 964 जणांना कस्तुरबा आणि इतर रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात तपासण्यात आले. त्यापैकी 1 हजार 138 संशयितांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कस्तुरबा आणि इतर खासगी रुग्णालयातून आतापर्यंत 968 संशयितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईमधील 24 आणि मुंबई बाहेरील 12 असे एकूण 36 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात नागरिक दहशतीखाली आहेत. दररोज शेकडोच्या संख्येने पालिकेच्या कस्तुरबा आणि इतर रुग्णालयात नागरिक कोरोनाची चाचणी करण्यास येत आहेत.