मुंबई- कोरोना व्हायरसचे संक्रमन थांबविण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात असताना एक चिंतेची बातमी समोर येत आहे. राज्यात लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे म्हणून रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस खात्यातील 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा- पालिका कर्मचारी फक्त २४ तास क्वारंटाईन; तातडीने कामावर येण्याचा फतवा
51 पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना...
51 पोलीस अधिकारी व 480 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत मुंबईत 3 पोलिसांचा तर पुण्यात 1, सोलापुरात 1, अशा 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 39 पोलीस हे बरे झाले असून यात 8 पोलीस अधिकारी व 31 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 487 पोलिसांवर उपचार सध्या सुरू आहेत. यात 43 पोलीस अधिकारी व 444 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लाॅकडाऊनदरम्यान 18 हजार आरोपींना अटक...
राज्याभरात 22 मार्च ते 7 मे या काळात 98 हजार 231 गुन्हे दाखल झाले आहेत. 18 हजार 858 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मुंबई वगळता क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 649 जणांवर राज्यात कारवाई करण्यात आली आहे. तर तब्बल 2 लाख 11 हजार 638 व्यक्ती क्वारंटाईन करण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 189 घटना घडल्या असून या प्रकरणी 683 जणांना अटक करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात पोलिसांवर सर्वांधिक हल्ले...
राज्यात वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडिकल पथकावर हल्ला झाल्याचे 30 गुन्हे घडले आहेत. तर 73 पोलीस कर्मचारी व 1 होमगार्ड असे 74 जण जखमी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 143 गुन्हे घडले असून जालना जिल्ह्यातून 46 तर साताऱ्यात 25 गुन्हे घडले आहेत. हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, गोंदिया सारख्या जिल्ह्यात कुठेही पोलिसांवर हल्ला झाल्याचे गुन्हे दाखल नाहीत.
अवैद्य वाहतुकीचे 1 हजार 281 गुन्हे...
राज्यभरात लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस विभागाच्या 100 या नियंत्रण नंबर वर आतापर्यंत 85 हजार 309 फोन आले आहेत. अवैद्य वाहतूक संदर्भात 1 हजार 281 गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 53 हजार 330 वाहन जप्त करण्यात आली आहेत.
पुण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद...
राज्यात सर्वाधिक गुन्हे पुणे शहरात घडले असून तब्बल 15 हजार 421 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड येथे 8 हजार 76 गुन्हे दाखल असून नाशिक शहरात 5 हजार 150, नागपूर शहरात 4 हजार 430 गुन्हे घडले आहेत. सर्वाधिक कमी गुन्हे हे रत्नागिरी 77 तर अकोल्यात 75 गुन्हे दाखल झाले आहेत.