मुंबई - मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील आरक्षण केंद्राच्या तिजोरीतून 44 लाख 29 हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे. याप्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसात आज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथील आरक्षण केंद्रातील तिजोरीत एका कर्मचाऱ्याने रविवारी रात्री १२ वाजता आपली कामाची वेळ संपल्यानंतर ही रक्कम ताब्यातील काउंटरमध्ये ठेवली व काउंटरचा ताबा दुसऱ्या कर्मचाऱ्यास दिला होता. या दरम्यान, सकाळी 4 ते 5 वाजता या कर्मचाऱ्यास काउंटरमधील रक्कम गायब झालेली आढळली. कर्मचाऱ्याने ही बाब वरिष्ठांना कळवून रक्कम चोरीची तक्रार कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिली आहे. ही रक्कम कोणत्या कर्मचाऱ्याने त्या काउंटरमधून काढली आहे का?, बाहेरचा कोणी तिजोरीजवळ आला होता, याची पडताळणी पोलिस करत आहेत. घटनेचा अधिक तपास कुर्ला लोहमार्ग पोलिस करीत आहेत.