मुंबई - डॉक्टर, पोलीस, सरकारी व महानगरपालिका कर्मचारी हे कोरोना योद्धाच कोरोनाचे शिकार होत आहेत. रुग्णांच्या थेट आणि सर्वाधिक काळ संपर्कात येणाऱ्या नर्सेस अर्थात परिचारिकांचाही बाधित होण्याचा आकडा आता वाढत आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यभरातील 412 सरकारी नर्सेसना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 4 नर्सेसचा मृत्यू झाला आहे. हा आकडा चिंताजनक असल्याचे म्हणत आता संघटनेने 7 दिवस कोरोना काम आणि 7 दिवस क्वारंटाईन सुट्टी देण्याची मागणी उचलून धरली आहे.
कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून सरकारी नर्सेस रुग्णसेवा देत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नर्सेसची कमतरता भासत आहे. मुळात गेल्या काही वर्षात नर्सेसची रिक्त पदेच भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आधीच नर्सेसची कमतरता आहे. त्यात कोरोना महामारी आल्याने अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अपुऱ्या मनुष्यबळामुळे आता राज्यभरातील नर्सेसवर कामाचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळेच त्यांना केवळ 3 दिवस क्वारंटाईन सुट्टी मिळत आहे. सात दिवसात कोरोनाची लक्षणे दिसत असताना 3 दिवसच सुट्टी मिळत असल्याने नर्सेसना लगेच कामावर यावे लागत आहे. अशावेळी आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून नर्सेसना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी हेमा गाजबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 412 सरकारी नर्सेसना कोरोनाची लागण झाली आहे. यात पुण्यातील ससून रुग्णालयातील नर्सेसचा आकडा सर्वाधिक आहे. ससूनमधील 126 नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. यापाठोपाठ जे जे रुग्णालय समूहा(मुंबई)तील 85 नर्सेस बाधित झाल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर नागपूरमधील जीएमसी रुग्णालय असून येथील 79 नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. 412 पैकी 4 नर्सेस दगावल्या आहेत. पुणे ससून, बीड जिल्हा रुग्णालय, डागा हॉस्पिटल आणि मिशन हॉस्पिटलमधील प्रत्येकी एका नर्सचा यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर परिचारिकांची रिक्त पदे भरत सात दिवस क्वारंटाईनसाठी सुट्टी देण्याची मागणी गजाबे यांनी उचलून धरली आहे. याच मागणीसाठी 1 सप्टेंबरपासून राज्यात संघटनेकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यभर काळ्या फिती लावून नर्सेस काम करत आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 8 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
रुग्णालये आणि कोरोनाबाधित नर्सेसची संख्या -
ससून रुग्णालय, पुणे - 126
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(जीएमसी), नागपूर - 79
जे. जे. रुग्णालय आणि समूह, मुंबई - 85
एसबीएच जीएमसी, धुळे - 26
जीएमसी, सोलापूर - 25
जीएमसी, लातूर - 16
आयजीएमसी नागपूर - 16
जीएमसी नांदेड - 7
आरसीएसएम जीएमसी अॅण्ड सीपीआर, कोल्हापूर - 7
जीएमसी, अंबेजोगाई - 3
जीएमसी, गोंदिया - 2
जीएमसी, यवतमाळ - 1
जीएच, परभणी - 7
उपजिल्हा रुग्णालय, निलंगा - 5
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर - 4
उपजिल्हा रुग्णालय, अहमदपूर - 2
रुरल हॉस्पिटल, देवणी - 1
एकूण-412
मृत्यू झालेल्या नर्सेस -
ससून रुग्णालय, पुणे - 1
जिल्हा रुग्णालय, बीड - 1
डागा हॉस्पिटल, नागपूर - 1
मिशन हॉस्पिटल, जालना - 1