मुंबई - शहर आणि परिसरात असलेल्या महानगरपालिका, अनुदानित आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या तब्बल ४१ टक्के विद्यार्थ्यांकडे अँन्ड्राईड मोबाईल नाहीत. तर कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई सोडून आपल्या गावी गेलेल्या ३२ टक्के विद्यार्थ्यांचा अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे उद्यापासून सुरू होत असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडणार असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांमध्ये १५ जूनपासून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात त्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने शहरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी नेमकी परिस्थिती काय आहे, याचा अभ्यास केला. त्याचा एक अहवाल नुकताच समोर आला असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुंबईत असलेल्या केवळ ५९.३४ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँन्ड्राईड मोबाईल उपलब्ध आहेत. त्यामुळे उर्वरित ४१ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुंबईत महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ९६६ प्राथमिक आणि २२३ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये १९ हजार ४१ शिक्षक तर ५ लाख ४१ हजार ८८० विद्यार्थी आहेत. एकूण शिक्षकांपैकी अजूनही ११ टक्के शिक्षक मुंबईत उपस्थित राहू शकलेले नाहीत. शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांची संख्या ही ४ हजार ४२ आहे. या शाळांमध्ये ६० हजार ३९३ शिक्षक आणि २० लाख १२ हजार ९४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील २१ टक्के विद्यार्थी कोरोनामुळे गावी गेले आहेत किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतरीत झालेले आहेत.
मुंबईत २० हजार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे अँन्ड्राईड मोबाईल आणि टीव्ही उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना ऑफलाईन अथवा इतर पर्यायाने शिक्षण कसे उपलब्ध करून देता येईल यावर उपाय काढण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक शाळांमध्ये पाठ्यपुस्तकही पोहोचवण्यात आली आहेत. पुढे ते विद्यार्थ्यां र्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा कामालाही लागली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास करता येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.
अनेक खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची सुरूवात करण्याची तयारी केली आहे. शाळा सरकारने निर्णय घेतल्याप्रमाणे सुरू होणार आहेत. जे पालक गावी गेलेले आहेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी येत्या काळात काही पर्याय समोर आणले जातील, असे प्रभारी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले .