मुंबई - दिल्ली, मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करणाऱ्या ४ अफगाणी नागरिकांना डीबी मार्ग पोलिसांनी गुरुवारी अटक केली. हे आरोपी जानेवारीपासून कुलाबा परिसरातील बिस्टोरीया हॉटेलसह इतर ठिकाणी वास्तव्याला होते.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात गर्दीचा फायदा घेऊन हे आरोपी मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करीत होते. मुंबईतील पायधुनी आणि दिल्लीतील करोलबाग पोलीस ठाण्यात या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. ग्रांट रोड परिसरात राहणारे एका कुरियर कंपनीचे संचालक मनोज सुमय्या यांच्या दुकानातून १२ फेब्रुवारीला १० लॅपटॉप असणारा बॉक्स चोरीला गेला होता. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीनंतर डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - चीनमध्ये कोरोनाचे १ हजार ३८० बळी ; तर ६३ हजाराहून अधिक नागरिकांना लागण
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विदेशी असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. त्यानुसार त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. १३ फेब्रुवारीला पोलिसांनी कुलाब्यातल्या बिस्टोरीया हॉटेलमध्ये छापा टाकून ४ जणांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - 'काँग्रेसने आपली मते 'आप'कडे का वळवली?'
या आरोपींकडून डेल कंपनीचे १० लॅपटॉप, विवो कंपनीचे १४ तर एमआय कंपनीचे ३५, असे एकुण ४९ मोबाईल जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत बाजारात जवळपास साडेपाच लाख आहे. याप्रकरणी जहान जिद रहमाणी(वय २७) आणि जबिउल्लाह रोहानी (वय ३१) या आरोपींना गिरगाव न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर २ आरोपींची चौकशी सुरू आहे.