मुंबई - कोरोना प्रादूर्भावात लागू केलेल्या टाळेबंदीच्या आव्हानात्मक परिस्थितीत ही राज्यातील उद्योगाला गती मिळत आहे. सध्या राज्यात ६६ हजार ९५३ उद्योग सुरू करण्यासाठी परवाने दिले आहेत. तसेच ३८२८७ उद्योगांना उत्पादन सुरू झाले आहे. त्यात १० लाख ६६ कामगार रुजू झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २१३१ उद्योग सुरू झाले आहे. तीस हजार कामगार रुजू झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये देसाई बोलत होते.
देसाई म्हणाले, की कोल्हापूर-मुंबई-बेंगळुरू परिसरात लॉजिस्टिक पार्क सुरू करण्यासाठी एमआयडीसी पुढाकार घेईल. शेतकरी जमीन देण्यास तयार असतील तर लॉजिस्टिक पार्क तयार केले जातील. उद्योगांना माफक दरात वीज देण्यासाठी एमआयडीसी वीज वितरणाचा परवाना घेणार आहे. चांदी उद्योगांसाठी धोरण ठरवले जाईल. त्याच बरोबर मागासवर्गीय उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजकल्याण मंत्र्यांसोबत बैठ घेतली जाईल. याशिवाय कापड उद्योगासाठी काय सवलती देण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. कोल्हापूर औद्योगिक वसाहतीत परिसरात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. राज्य शासन त्यांना मदत करण्यास तयार आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक कामगारांसाठी आम्ही कामगार ब्यूरो सुरू करत आहोत. उद्योगांनी स्थानिकांना या ठिकाणी रोजगारांची संधी द्यावी. कामगार, कौशल्ये, उद्योग विभागाद्वारे हे ब्युरो चालवले जाणार आहे. यातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असेही देसाई यांनी सांगितले.