मुंबई - खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे केंद्र उभारले जाईल.
या मतदान केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा याअनुषंगाने सखी मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.
हेही वाचा - 'भाजपला सत्ता येणार असल्याचा विश्वास, मग मोदी-शाहंच्या सभा का?'
सर्वकाही महिलांकडूनच संनियंत्रित करण्यात येणाऱ्या या मतदान केंद्रांमध्ये कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. या केंद्रांमध्ये कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर करु नये, असे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. या केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्या आवडीचा कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. हे केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येईल.
अशी केंद्रे निवडताना सुरक्षिततेवर विशेष लक्ष पुरवण्यात येईल. संवेदनशील ठिकाणे टाळून तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यानजीक, अशी केंद्र उभारण्यात येतील. ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्रांची, सखी मतदान केंद्रांकरता विशेष निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा - आरपीआयचे कार्यकर्ते नाराज; महायुतीच्या उमेदवारांना बसणार फटका?