मुंबई - सध्या देशात पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. देशातल्या अनेक राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागातल्या ३५ टक्के लोकांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटर जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. तसेच देशातल्या ६० कोटी लोकसंख्येवर पाण्याचे माठे संकट उभे असल्याची माहिती 'गाव कनेक्शनच्या' सर्वेतून समोर आली आहे.
गाव कनेक्शन या माध्यम समूहाने १९ राज्यातील १८ हजार लोकांशी चर्चा करुन पाण्यासंदर्भात सर्वे केला. या सर्वेतून ग्रामीण भागातल्या ३५ टक्के लोकांना अर्धा किलोमीटवरून पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी अनेक ठिकाणी मुलांना शाळेतही जाता येत नाही. दिवसातून त्यांना दोन वेळा पाणी आणावे लागत आहे.
अस्वच्छ पाणी पिल्याने दरवर्षी २ लाख लोकांचा मृत्यू
२०१८ मध्ये निती आयोगाच्या एका सर्वेतून भारत देशात पाण्याची मोठी समस्या असल्याचे समोर आले आहे. अस्वच्छ पाणी पिल्याने दरवर्षी २ लाख लोकांचा मृत्यू होतो. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून २०२० पर्यंत ७० टक्के ग्रामीण घरांमध्ये पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, २०१७ पर्यंत केवळ १७ टक्केच घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा झाला होता.
नीती आयोगाच्या २०१८ च्या अहवालानुसार २०२० पर्यंत दिल्ली आणि बंगळुरू सारख्या २१ शहरात पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. पाणीपुरवठा स्वच्छता गुणांमध्ये भारताचा १२२ देशात १२० वा क्रमांक लागतो. ही सगळ्यात मोठी समस्या आहे.
२०१२ च्या निती आयोगाच्या अहवालानुसार, जगातील एकूण लोकसंख्येपैकी १८ टक्के लोकसंख्या भारतात राहते. पाण्याचे संकट हे फक्त भारतातच नसून संपूर्ण देशात ही समस्या आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पाणी अहवालानुसार, संपूर्ण देशात १९८० नंतर प्रत्येक वर्षी पाण्याचा वापर १ टक्क्याने वाढला आहे. २०५० पर्यंत जगभरात पाण्याचा वापर २० ते ३० टक्क्यांनी वाढणार आहे.