मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील ( BMC School ) विद्यार्थ्यांची गळती मोठ्या प्रमाणात होत होती. या गळतीवरून पालिकेवर आणि शिक्षण विभागावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. मात्र पालिकेने राबवलेल्या मिशन ऍडमिशन आणि विविध उपाययोजनांमुळे गळतीचे प्रमाण नगण्य झाले आहे. मात्र शिक्षण विभागाच्या ( Brihanmumbai Municipal Education Department ) चुकीमुळे बांद्रा पूर्व येथील खेरनगर महापालिका शाळेतील तब्ब्ल ३०१२ विद्यार्थी शाल बाह्य झाली आहेत. याबाबतची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, पालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे ( Shivnath Darade ) यांनी दिली.
मुख्याध्यापकांच्या पत्राकडे दुर्लक्ष : मुंबई महापालिकेच्या बांद्रा पूर्व येथे खेरनगर महापालिका शाळा आहे. शाळा संकुलात २ इमारती आहेत. त्यात विविध माध्यमाच्या १० शाळा सुरु होत्या. या १० शाळांमध्ये एकूण ४९२६ विद्यार्थी शिकत होते. शाळेच्या २ इमारतीमधील एक इमारत धोकादायक झाल्याने पाडण्यासाठी रिकामी करण्यात आली आहे. तर दुसरी इमारत दुरुस्तीला काढली आहे. मुंबईमधील शाळा कोरोनामुळे बंद होत्या, यंदा त्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर शाळा बंद करू नये, मार्च एप्रिलपर्यंत शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत वाट बघावी व त्यानंतर दुरुस्ती किंवा इतर कामे करावीत, असे पत्र ऑगस्ट २०२२ मध्ये मुख्याध्यापकांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला दिले. मात्र, त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही, असे दराडे यांनी सांगितले.
३०१२ विद्यार्थी शाळाबाह्य : शाळेची एक इमारत धोकादायक असल्याने त्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या खासगी संस्थेच्या कॉलेजला दुसऱ्या दुरुस्त करण्यात येत असलेल्या इमारतीमध्ये जागा देण्यात आली आहे. यामुळे शाळेमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने सांताक्रूझ, खार व बांद्रा पूर्व येथील शाळांमध्ये पाठवण्यात आले. विद्यार्थी राहत असलेल्या परिसरातून येथे जाण्यासाठी बसची सुविधा नाही. घरातील पालक कामावर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे शक्य होत नाही. पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग चौथ्या मजल्यावर सुरु करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत येणे बंद केले आहे. अशा विविध कारणांनी या शाळेतील ३०१२ विद्यार्थ्यांनी शाळे जाणे बंद केले आहे, अशी माहिती दराडे यांनी दिली.
दहावीच्या ६०० मुलांचे नुकसान : या शाळेच्या संकुलात १० विविध माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये दहावीचे ८०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ६०० विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या पालिकेच्या शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. अशा वेळी हे विद्यार्थी शाळेत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे असा आरोप दराडे यांनी केला आहे.