मुंबई - महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या ( Non Granted School Teacher Strike ) सुमारे 30 हजार विनाअनुदानीत शिक्षकांनी यंदा उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (10th Class Result ) उशिराने लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
'तोपर्यंत पेपर तापसणार नाही' - कायम विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना १०० टक्के अनुदान देण्याची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन सुरु असेल. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या सुमारे 30 हजार सदस्यांनी म्हणजेच विनाअनुदानीत शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. परिणाम म्हणजे विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे आजही शाळांमध्ये तपासणीविना पडून आहेत. शासनाने विनाअनुदानित शाळांसाठी प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याची मागणी तत्काळ पूर्ण करावी. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवा संरक्षण देण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पेपर तपासणी करणार नसल्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.
उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना - कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे राज्यातील ६ हजार ५०० शाळांमध्ये बोर्ड पेपरचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे आंदोलन अचानक छेडले नसून उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्काराचा इशारा २४ फेब्रुवारीला दिल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच या इशाऱ्यानंतर कुठल्याही प्रकारची मागणी मान्य न झाल्याने सर्व शिक्षकांनी बहिष्कार आंदोलन पुकारल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.