मुंबई - गोरेगावच्या आंबेडकरनगरमध्ये बुधवारी रात्री घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेला होता. या चिमुकल्याला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. परंतु, चिमुकला अद्यापही सापडला नाही. त्यामुळे अग्निशमन दलाकडून परिसरातील इतर ३ मेनहोल उघडून महापालिकेचे आपत्ती निवारण पथक या चिमुरड्याचा शोध घेत आहे.
गोरेगावच्या आंबेडकरनगरमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस सुरू होता. पावसामुळे गटार मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला आणि चुकून उघड्या गटारात पडला. गटारातील पाणी जोराने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबतच तो वाहून गेला. घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या चिमुकल्याचा शोध सुरू केला.
मागील २४ तासांपासून बचाव पथकाकडून या मुलाचा शोध घेण्यात येत आहे. याअगोदर अग्निशमन दलाने नाल्यात दोनदा चालत पाहणी केली आहे. तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पश्चिमेला ड्रोनच्या सहाय्यनेही तपासणी केली. मात्र, चिमुकल्याचा शोध लागला नाही. आता तिसऱ्यांदा एनडीआरएफचे कर्मचारी पाहणी करत आहेत.
त्यानंतर एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन सर्च ऑपरेशन सुरू केले. पथकाकडून घटना घडलेल्या ठिकाणी असलेल्या नाल्यावरील बांधकाम तोडून पुन्हा एकदा या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. घटना घडली तेथून ते गोरेगाव जेथे नाल्याचा शेवट होतो त्याठिकाणपर्यंत एनडीआरएफचे पथक चालत जाऊन शोधण्यास सुरुवात केली. तरीही चिमुकला सापडला नाही.
दरम्यान, आता अग्निशमन दलाकडून परिसरातील इतर ३ मेनहोल उघडून महापालिकेचे आपत्ती निवारण पथक या चिमुरड्याचा शोध घेत आहेत.