कल्याण: कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोड श्रीराम अनुग्रह टॉवर येथे बिबट्या शिरला. चिंचपाडा रोडवर बिबट्याचा धुमाकूळ 3 जण जखमी झाले आहे. वनविभागला पाचारण केले आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरून नागरिकांची रस्त्यावर एकच गर्दी जमली आहे. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे. कल्याण शहराच्या पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात चिंचपाडा रोड येथील अनुग्रह टॉवर या इमारतीत बिबट्या शिरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
पूर्व भागात भीतीचे वातावरण: कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हा परिसर तसा दाट लोकवस्तीचा आहे. मात्र शेजारीच हाजी मलंगचा विस्तीर्ण घनदाट जंगलाचा डोंगर भाग आहे. या भागातून हा बिबट्या आला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र बिबट्याच्या प्रवेशाने कल्याण पूर्व भागात भीतीचे वातावरण आहे. काही वर्षांपूर्वी लोकसंख्येची दाट घनता असलेल्या उल्हासनगर शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी एका घरात बिबट्या शिरला होता. त्यानंतरची शहरी भागात बिबट्या येण्याची ही दुसरी घटना आहे.
वन विभागाचे पथक दाखल: बिबट्याला सध्या एका ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले असून इमारतीतील सर्व रहिवाशांना दारे खिडक्या बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यालयातून वन विभागाचे पथक दाखल होतात बिबट्याला जेरबंद केले जाईल, अशी माहिती कल्याणचे वनक्षेत्रपाल संजय चन्ने यांनी दिली आहे.