मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची ( Measles Patients ) संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण 176 रुग्णांची तर 2860 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवंडीमधील एका 10महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा 9 झाला आहे. 9 मृत्यूपैकी एक मृत्यू मुंबई बाहेरील आहे. 46 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 137 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 7 रुग्ण ऑक्सीजनवर 2 रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
137 रुग्ण रुग्णालयात - मुंबईत 23 लाख 87 हजार 386 घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले २८६० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे 176 रुग्ण आढळून आले आहेत. 0 ते 8 महिन्याचे 18, 9 ते 11 महिने , 1 ते 4 वर्ष 64, 5 ते 9 वर्षे 28, 10 ते 14 वर्षे 9, 15 आणि त्यावरील 9 असे एकूण 137 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 7 रुग्ण ऑक्सिजनवर तर 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 46 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात 13 हजार 962 मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
9 संशयीत मृत्यू - 26 ऑक्टोबरपासून मुंबईत 9 मृत्यू झाले आहेत. त्यामधील एक मृत्यू मुंबई मुंबई बाहेरील (भिवंडी) येथील आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
गोवंडी येथील मुलीचा मृत्यू - 10 महिन्याच्या गोवंडी येथील एका मुलीचा 3 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला आहे. गोवंडी येथील ही मुलगी आहे. ही मुलगी दि. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान ठाणे येथे वास्तव्यास होती. 1 नोव्हेंबर रोजी तीला ताप व पुरळ आले. खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर चेंबूर येथील खाजगी रुग्णालयाने सदर मुलीला श्वसनाचा त्रास असल्यामुळे महानगरपालिकेच्या रूग्णालयात पाठवले. परंतु अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नसल्याने वाडीया रुग्णालयात दाखल केले. वाडिया रुग्णालयात 2 नोव्हेंबर रोजी मुलीची स्थिती गंभीर झाल्याने वेंटीलेटर सुविधेसाठी सदर मुलीच्या पालकांनी खाजगी रूग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. परंतु खाजगी रूग्णालयात संदर्भित करत असताना सदर मुलीचा 3 नोव्हेंबर रोजी इतर रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला.
भिवंडी येथील मुलाचा मृत्यू - भिवंडी येथील 6 महिने वयाच्या मुलाचा 17 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला आहे. त्याला 7 नोव्हेंबर रोजी ताप, सर्दी व खोकला झाला होता. 10 रोजी त्याला पुरळ आले होते. 7 ते 10 नोव्हेंबरपर्यंत त्याच्यावर खाजगी रूग्णालयात बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. 10 नोव्हेंबर रोजी सदर रुग्णास खाजगी रूग्णालयातून महापालिकेच्या रूग्णालयात पाठवण्यात आले. 13 रोजी महापालिकेच्या रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. 17 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
लसीकरण आणि जनजागृतीवर भर - मुंबईत 0 ते 2 वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात 20 हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा 20 हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या 8 विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे. धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे. गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.