मुंबई : नवीन पनवेल आणि घणसोलीमध्ये बंगला वा रो हाऊस बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना सिडकोने एक मोठी खुशखबर दिली आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर सिडकोने घणसोली आणि नवी पनवेलमधील 27 निवासी बंगले तसेच रो हाऊस भूखंड विक्रीसाठी जाहिरात काढली आहे. त्यानुसार 14 जानेवारीला या भूखंडांचा ई-लिलाव होणार आहे.
आजपासून नोंदणी सुरू..
नवी मुंबई परिसरात सिडकोच्या मालकीच्या मोठ्या संख्येने जमिनी आहेत. या जमिनीवर परवडणारी घरे बांधत त्यांची विक्री लॉटरी द्वारे केली जाते. तर मोकळ्या भूखंडाची ही लिलावाद्वारे विक्री केली जाते. त्यानुसार सिडकोने आता घणसोली आणि नवीन पनवेल येथील 27 भूखंड विक्रीसाठी काढले आहेत. ई-लिलावाद्वारे याची विक्री होणार असून, त्यासाठी बेस रेट देण्यात आले आहेत. तर या ई-लिलावासाठी सोमवारपासून इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. सिडकोच्या संकेतस्थळावर जाऊन ही नोंदणी करता येणार आहे. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून नोंदणी सुरू होईल आणि 13 जानेवारीला रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. तर 14 जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत ई-लिलावाची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
घणसोलीत 12 तर नवीन पनवेलमध्ये 15 भूखंड विक्रीसाठी..
सिडकोच्या जाहिरातीनुसार घणसोलीत 12 तर नवीन पनवेलमध्ये 15 निवासी भूखंड विक्रीसाठी काढले आहेत. घणसोलीतील भूखंड 65.29 ते 66.96 चौ. मी. चे आहेत. तर नवीन पनवेल मधील भूखंड 146.28 ते 831.67 चौ. मी. चे आहेत. नवीन पनवेलमधील भूखंडासाठी 39,200 रुपये प्रति चौ. मी. असे तर घणसोलीतील भूखंडासाठी 30 हजार 800 ते 35 हजार 813 रुपये प्रति चौ. फूट असा बेस रेट ठरवण्यात आला आहे. या ई-लिलावात सहभागी होण्यासाठी भूखंडाच्या एकूण अंदाजित रकमेच्या 10 टक्के अनामत रक्कम भरावी लागणार आहे. घणसोलीसाठी 2 लाख 3 हजार 300 ते 2 लाख 42 हजार 600 रुपये इतकी अनामत रक्कम आहे. तर नवीन पनवेलसाठी 5 लाख 71 हजार 500 ते 32 लाख 60हजार 200 रुपये अशी अनामत रक्कम असणार आहे.