मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील जिल्ह्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताचा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोकणातील जनतेला नुकसान भरपाईसाठी शब्द दिलेला होता. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 'तो' शब्द पाळलेला आहे. निसर्ग चक्रीवादळाग्रस्तांप्रमाणे तीनपटीने वाढीव रक्कमेने २५२ कोटी रुपयांची भरीव नुकसान भरपाई केल्याची घोषणा केली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
हेही वाचा - चलनी नोटा छापण्याची वेळ आली - उदय कोटक यांचा केंद्राला सल्ला
- २५२ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर -
कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी कोकणाचा दौरा केला होता. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. अशातच या चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवे निकष लावल्यामुळे कोकणवासियांना अधिक मदत दिली जाणार आहे. अजूनही काही पंचनामे शिल्लक आहेत, त्यामुळे या मदतीत आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदमध्ये दिली आहे.
- शेवटच्या घटकांपर्यंत मदत पोहोचवणार -
कोकणवासीयांना या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी महविकास आघाडी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला. जर आपण केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे नुकसान भरपाई दिली असती तर फक्त ७२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली असती, पण मुख्यमंत्र्यांनी तीन पट अधिक मदत देण्याचा निर्णय घेतला. २५२ कोटी रूपयांची मदत कोकणवासीयांना महाविकास आघाडीचे सरकार मार्फत देणार आहे. या २५२ कोटी पैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटी १८ लाख ४३ हजार आणि रत्नागिरीसाठी ३० कोटी ७३ लाख ४३ हजार आर्थिक पॅकेज घोषित केले आहे. ही मदत शेवटच्या घटकापर्यत पोहचावी यासाठी पालकमंत्री म्हणून मी दक्षता घेणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदमध्ये दिली आहे.
- लॉकडाऊन वाढविण्याची मागणी-
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर माझं लक्ष आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करणार आहे, असेसुद्धा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा - मोदी है तो मुमकीन है... पेट्रोल दर वाढीवरुन खासदार इम्तियाज जलील संतप्त