मुंबई - कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर्सचा वापर वाढला आहे. याचाच फायदा घेत मुंबईत बनावट सॅनिटायझर्स तयार केले जात असून आजही अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए) ने 25 लाखांचा बनावट सॅनिटायझर्सचा साठा जप्त केला आहे. मुलुंड पश्चिम येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बनावट सॅनिटायझर्स आणि मास्कविरोधात एफडीएने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यभरातून 56 लाखांहून अधिक बनावट सॅनिटायझर्सचा साठा जप्त केला आहे, तर आज गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम येथे कारवाई करत 25 लाखांचा बनावट सॅनिटायझर्सचा साठा जप्त केला आहे. सिद्धिविनायक डायकेम प्रा. लिमिटेडकडून विनापरवाना सॅनिटायझर्स तयार केले जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
दरम्यान, या कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त डी. आर. गहाणे यांनी दिली आहे, तर नागरिकांनी सॅनिटायझर्स खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी आणि खरेदी बिल घ्यावे, असे आवाहनही केले आहे.