मुंबई - गेल्या तीन महिन्यापासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers Strike) वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने (MSRTC) गेल्या दीड महिन्यापासून कारवाईचं सत्र सुरुच ठेवले आहे. आज महामंडळाने २४३ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ (ST Workers Dismissed) केले आहे. आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ६ हजार ८५४ वर पोहचली आहे. तर आतापर्यत ८ हजार ६७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
- आतापर्यंत साडे सहा हजार कर्मचारी बडतर्फ :
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करूनसुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाहीत. या संपावर तोडगा निघावा यासाठी एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असं आवाहन केले. मात्र, तरीसुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाची कारवाई जोरदार सुरु आहे. आज २४३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या ६ हजार ८५४ झाली आहे. आतापर्यत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार ६७ झाली आहे.
- ६२ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात -
सध्या ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी फक्त २७ हजार २८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. उर्वरित ६२ हजार ७१२ कर्मचारी आता पण संपात सहभागी आहेत. आज राज्यभरात एसटीच्या ८ हजार २८४ फेऱ्या धावल्या आहेत. याशिवाय आज २५० आगारांपैकी २४५ आगार सुरु झाले असून, ५ आगार अद्यापही बंद असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.