मुंबई - शहरातील हॉटस्पॉट असलेल्या धारावीत गेल्या 24 तासांत नवे 20 रुग्ण आढळले आले आहेत. यामुळे धारावीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 138 वर पोहोचली आहे, तर धारावीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
धारावीच्या ढोर वाडा, कायलान वाडी, बाबा मस्जिद, शिवशक्ती नगर, सनाउल्ला कंपाऊंड, चमडा बाजार, राजीव गांधी चाळ, कुचिकुरवे नगर, मुकुंद नगर, नाईक नगर, फातिमा चाळ आदी ठिकाणी नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या फातिमा नगरमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत. आज आढळून आलेल्या 20 रुग्णांपैकी 8 महिला तर 12 पुरुष रुग्ण आहेत.
धारावीत सतत रुग्ण वाढत असल्याने या ठिकाणी घराघरात जाऊन तपासणी केली जात आहे. डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉयची कमतरता असल्याने या विभागात आरोग्य सेवा देता यावी म्हणून 120 डॉक्टर नर्स, वॉर्ड बॉय यांची भरती केली जात आहे. धारावीमधील रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून 50 हजार लोकांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या गोळ्या दिल्या जाणार आहेत.