मुंबई - मुंबईमध्ये एकीकडे कोरोनाचा प्रसार असताना स्वाईन फ्लूचे २ रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण बरे झाले आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५० टक्के कमी रुग्ण आढळून आले आहेत. स्वाईन फ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
रुग्णसंख्येत ५० टक्के घट
मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी होत आहे. त्यातच मुंबईत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. याबाबत पालिकेकडूनही खुलासा करण्यात आला आहे. मुंबईमध्ये मागील वर्षी जूनपर्यंत स्वाईन फ्लूचे ५ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी २ रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा रुग्णसंख्येत ५० टक्के घट झाल्याचे दिसत आहे.
पालिका सज्ज
मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण समोर येतात. स्वाईन फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाला तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, स्वाईन फ्लूच्या लढाईसाठी पालिका सज्ज आहे. स्वाईन फ्लू रुग्णांसाठी लागणारी औषधे पालिका रुग्णालयात आहेत. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे काकाणी यांनी सांगितले.
स्वाईन फ्लूची लक्षणे
स्वाईन फ्लू रोगाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो. याचा संसर्ग माणसाद्वारेसुद्धा होतो. रुग्णाच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा थुंकी यामधून स्वाईन फ्लू विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात. लक्षणे सर्व साधारणतः फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंशापेक्षा जास्त, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी अशी स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत.
हेही वाचा - नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव - राज ठाकरे