मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन सुरू आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. मात्र, 2 किलोमीटरचा नियम पोलिसांनी रद्द केला आहे.
30 जून व 1 जुलै दरम्यान मुंबई व उपनगरात पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईत नागरिकांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना घरापासून 2 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर वाहण नेण्यास बंदी आहे. या नियमावर राजकीय टीका होताच हा निर्णय पोलीस विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुंबई पोलिसांनी नवीन परिपत्रक जारी केले. या परिपत्रकात मुंबई पोलिसांनी 2 किलोमीटरच्या पुढे जाणाऱ्या वाहनांवरील कारवाईचा उल्लेख टाळला आहे.
29 जून रोजी मुंबई ट्राफिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात 8 हजार 611 वाहन जप्त करण्यात आली आहेत. यात 474 तीन चाकी वाहन, 295 टॅक्सी, 1 हजार 601 खासगी वाहन, तर तब्बल 6 हजार 241 दुचाकी वाहन जप्त करण्यात आली आहेत. तर याच दिवशी मुंबई पोलिसांच्या शहरातील 12 परिमंडळात करण्यात आलेल्या 137 नाकाबंदीत चेक पॉईंट वर पोलिसांनी 30 हजार 72 वाहनांची तपासणी केली आहे. यात 6 हजार 80 वाहन जप्त केली आहेत. 30 जूनला 3 हजार 508 आणि 1 जुलैला 2 हजार 369 इतक्या गाड्या 2 किमी नियमानुसार जप्त केल्या आहेत.