मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुंबईतील विधानभवनातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी नेते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे नेते छत्तीसगढच्या रायपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र बाळासाहेब थोरात आणि अन्य नेत्यांनी दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या बैठकीनंतर विधानभवनातील वार्ताहर कक्षात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही माहिती दिली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या : राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या समस्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळत नाहीये. काही शेतकऱ्यांना फक्त दोन रुपये दिले जात आहेत. यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणाले की, "तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्याने सांगत आहेत आम्ही सर्व शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नियमांपेक्षा अधिक नुकसान भरपाई दिलेली आहे. मात्र, आम्ही जेव्हा वेगवेगळ्या भागांमध्ये जातो फिरतो त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की एकाही शेतकऱ्याला ही नुकसान भरपाई ची मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायात. शेतीचा खर्च वाढलाय आणि शेतीमालाला मात्र किंमत राहिलेली नाहीये. अशी सध्या परिस्थिती आहे."
शेतकऱ्याला मिळाले फक्त दोन रुपये : काही दिवसांपूर्वीच अंबादास दानवे आणि माझ्या नावाने एका शेतकऱ्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवला होता. हा बार्शीचा शेतकरी आहे. या शेतकऱ्याची अवस्था बघा. त्या शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं, 17 फेब्रुवारीला 512 किलो कांदा विकला. त्याला किलोला एक रुपयाप्रमाणे भाव आला. ट्रान्सपोर्ट, हमाली वजा जाता व्यापाऱ्यांनी दहा पोथी कांद्याचे त्याला दोन रुपयाचा चेक दिलाय. व्यापाऱ्याने या शेतकऱ्याला दोन रुपयाचा चेक दिलाय तो देखील तीन आठवड्यांनी. हे दुर्दैव आहे.' असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
वर्षा बंगल्यावर दोन महिन्याचा जेवणाचा खर्च दोन कोटी : मध्यंतरी माहिती अधिकारांतर्गत मुख्यमंत्र्यांच शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावरील फक्त दोन ते चार महिन्याचा जेवणाचा खर्च तब्बल दोन कोटी रुपये झाल्याची माहिती समोर आली होती. आता या दोन ते चार महिन्यात मुख्यमंत्र्यांनी एवढं काय केलं की तब्बल दोन कोटी रुपये जेवणाचा खर्च आला. तिकडे वर्षा बंगल्यात जी काही चहा दिली जाते त्यात पाणी हे काय सोन्याच वापरलं जातं का? हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशांचा अशाप्रकारे चुराडा केला जातोय.' अशी टीका देखील अजित पवार यांनी केली.
राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? : पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, "राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही हा देखील एक प्रश्न आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यात ठाण्यातीलच एक अधिकारी या धमक्या देतोय. खासदार संजय राऊत यांना देखील धमक्या येत आहेत. त्यांची सुपारी दिल्याची माहिती आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर देखील पाळत असल्याचं मध्यंतरी त्यांनी सांगितलं. पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या होतो. म्हणजे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही हाच प्रश्न यातून निर्माण होतो. मग सरकार म्हणून हे नेते काय करणार आहेत? आज जर एखाद्या पत्रकारावर हल्ला होत असेल लोकप्रतिनिधींना अशा धमक येत असतील तर मग सामान्य जनतेने काय करायचे?", असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
मनसेच्या एका आमदाराने पक्षावर दावा केला तर? : शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "आता निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आणि यात त्यांनी लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेऊन हा निर्णय दिल्याचे म्हटलं आहे. खरं पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची त्यांनी वाट पाहणे गरजेचे होतं. मात्र, तसं झालं नाही. एक उदाहरण म्हणून लक्षात घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार आहे. आता उद्या चालून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका आमदारांन बंडखोरी केली आणि त्यांना सांगितलं की संपूर्ण पक्षच माझा आहे तर कसं होईल. या सर्व मनमानी कारभारामुळे जनतेमध्ये एक रोष आणि असंतोष आहे." असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शासकीय चहापानावर बहिष्कार : दरम्यान, आपल्या पत्रकार परिषदेचा शेवट करताना अजित पवार म्हणाले इतक्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात घडत असताना आम्ही सरकारने आयोजित केलेल्या चहा पानाच्या कार्यक्रमाला जाऊन उपस्थिती लावणे म्हणजे जनतेच्या भावनांशी केलेला खेळ होईल. त्यामुळे आम्ही या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहोत. सोबतच आम्ही सर्वजण नवीन राज्यपालांचे देखील भेट घेणार असून त्यांच्याकडे देखील आम्ही आमच्या मागण्या मांडणारा आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली.