मुंबई - शुक्रवारी मुंबईत 1 हजार 876 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 48 बाधितांचा मृत्यू झाला. याबरोबरच येथील एकूण कोरोनाबाधितांची 1 लाख 94 हजार 77वर पोहोचली आहे. तसेच 1 हजार 169 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. यानंतर गेले सहा महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी मुंबईत कोरोनाच्या 1 हजार 876 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. 48 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 94 हजारावर पोहोचला आहे.
शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये 42 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष तर 18 महिला रुग्ण आहेत. एकूण मृतांची संख्या 8 हजार 703वर पोहचली आहे. मुंबईमधून आज 1169 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 56 हजार 807वर गेला आहे. सध्या मुंबईत 28 हजार 273 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 63 दिवस तर सरासरी दर 1.11 टक्के आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 686 चाळी आणि झोपडपट्टी कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 10 हजार 871 इमारती आणि इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 10 लाख 57 हजार 640 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.