मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या P 305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरची सुद्धा या बचाव कार्यात मदत घेतली जात आहे. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून आतापर्यंत 180 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे.
नौकेवर अडकलेल्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु
भारतीय नौदलाचे स्पीकिंग हेलिकॉप्टर जीएल कन्स्ट्रक्टर नावाच्या जहाजावरील अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी काम करत असून मुंबईच्या उत्तरेला सदरचे जहाज समुद्रात अडकलेले आहे. आतापर्यंत या हेलिकॉप्टरने या जहाजावरील 35 कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे. तसेच, गुजरातचा पीपावाव किनाऱ्यापासून 15 ते 20 सागरी मैलांवर असलेल्या सपोर्ट स्टेशन 3, ग्रेट शिप आदिती व ड्रिल शिप सागर भूषण या जहाजांसाठी शोधमोहीम व बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. आयएनएस तलवार ते जहाज त्या भागात पोहोचले पोहचले आहे. नौदल हे ओएनजीसी आणि जहाजबांधणी महासंचालनालयशी समन्वय साधून काम करत आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव पाहता, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून समुद्र अजूनही खवळलेला असल्याचे नौदलातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग हा 35 ते 55 किलोमीटर प्रतितास असल्यामुळे बचावकार्यात यामुळे अडथळा येत असल्याचे नौदलाचे म्हणणे आहे. अशा बिकट परिस्थितीत बचाव कार्य करत असताना नौदलाची जहाज व हेलिकॉप्टरना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.